मुंबई. Raj Thackeray Cartoon On India-Pak Match : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला सात विकेट्स आणि 31 चेंडू राखत चारीमुंड्या चीत केले. या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारल्याने या मुद्दा चांगलाच गाजत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी खेळू नये म्हणून देशभरातून तीव्र विरोध होत होता. शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही या सामन्याला विरोध करत महिलांनी पंतप्रधान मोदींना सिंधूर पाठवून आपल्या भावना व्यक्त कराव्यात असे आवाहन केले होते. दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आणि त्यांचे पुत्र आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतावादी हल्ल्यानंतर भारतीयांच्या भावना तीव्र असून भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंधही ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी अनेक स्तरातून मागणी होत होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. त्यातच आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील भारत पाकिस्तान सामन्यावरून सरकारला धारेवर धरले आहे.
#पहलगाम #काश्मीर #PahalgamAttack #BCCI #ICC #AsiaCup #INDvsPAK#Cricket pic.twitter.com/ASx9fpB81Y
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2025
राज ठाकरेंनी व्यंगचित्रद्वारे नेमकं काय म्हटलंय?
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील आशिया चषकातील क्रिकेट सामन्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून आयसीसी आणि गृह मंत्रालयावर आसूड ओढले आहेत. नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं? असा प्रश्न व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी विचारला आहे. या व्यंगचित्रात गृहमंत्री अमित शाह आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह दिसतात. त्याचबरोबर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले भारतीय या व्यंगचित्रात आहेत...या व्यंगचित्रात अरे बाबांनो उठा! आपण जिंकलो पाकिस्तानी हरले...असं आयसीसी (जय शाह) आणि गृह मंत्रालय (अमित शाह ) त्यांना सांगत आहे.
भारत-पाकिस्तानच्या सामन्यावर 1500 कोटींचा सट्टा लागल्याचा व पाकिस्तान क्रिकट बोर्डाला 1 हजार कोटींचा निधी मिळाल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने परवानगी दिल्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळली,असं संजय राऊत यांनी सुनील गावसकर यांच्या वक्तव्याच्या आधाराने म्हटले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने हस्तांदोलन केलं नाही हा मोठा विनोद असल्याचेही संजय राऊत म्हणाले. तुम्ही पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळलात ना?, देशासाठी लोकांनी रक्त सांडलं, फासावर गेले, अनेक लोक शहीद झाले..आणि तुम्ही हस्तांदोलन केलं नाही, त्याचं कौतुक करताय,देशाची जनता मुर्ख आहे का?,असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.