जेएनएन, मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘जेल भरो आंदोलन’ करण्यात येत असतानाच, या आंदोलनाला विरोध करणाऱ्या जेन नेक्स्ट गटाने फोर्ट परिसरात आंदोलन सुरू केले आहे. फोर्टमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जेन नेक्स्टच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.
दरम्यान, CJPने आज, 2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक 6 जवळ आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, परवानगी नसतानाही आंदोलन करण्यावर CJP ठाम राहिले.
CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच 2025ची मतदार यादी गोठवून त्याच आधारे निवडणुका घेण्यात याव्यात आणि भविष्यातील निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व स्वतंत्र असावी, अशी मागणी CJPने केली आहे.
CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी स्थानिकांकडूनही विरोध झाल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, CJPच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्टकडून फोर्ट परिसरात स्वतंत्र आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क आणि फोर्ट अशा दोन ठिकाणी आंदोलनांमुळे वातावरण तापले आहे.
अभिजीत दीपके यांनी मुंबईतील आंदोलनानंतर देशातील अन्य शहरांमध्येही आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईपासून सुरू होणारे हे आंदोलन पुढे गोवा, कोलकाता आदी ठिकाणी नेऊन अखेरीस दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. CJPचे आंदोलन आणि त्याला विरोध करणाऱ्या जेन नेक्स्टच्या निदर्शनांमुळे मुंबईतील राजकीय वातावरणात तापला आहे.
