ठाणे. Salman Khan Ladki Bahin Yojana: ठाण्यात मंगळवारी ‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला. ही स्पर्धा शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी शिंदेंनी उपस्थित खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींचे स्वागत केले. ५ एप्रिलपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील १६ संघ सहभागी झाले आहेत.

यावेळी एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी करत म्हटले की, क्रिकेट आहे तर विकेट आहे, मी देखील २०२२ साली एक मोठी विकेट काढली होती, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला. आजही काही जण खेळण्याचा प्रयत्न करतात, पण खेळू शकत नाहीत. कारण माझी फिल्डिंग अजूनही टाईट आहे.

सलमानकडे बघत शिंदे म्हणाले, तुम्ही बहि‍णींवर 'बंधन' सिनेमा काढला, मीपण लाडकी बहीण योजना सुरु केली, असं एकनाथ शिंदे म्हणताच 'लाडकी बिवी या गर्लफ्रेण्ड भी निकालो' अशी मिश्कील टिपणी सलमानने केली. त्यावर एकनाथ शिंदेंनी 'लाडके भाईजान योजना काढू', असं म्हटलं. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या कारकि‍र्दीवर सिनेमा आला, तर सलमानच्या 'बंधन'प्रमाणे मी 'रक्षाबंधन' नाव ठेवेन.

सलमानला गर्दीने घेरलं -

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आयोजित 'प्रेसिडेंट कप 2026 उद्घाटन सोहळ्यासाठी सलमान खान उपस्थित होते. या सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये सलमान खान खूपच आनंदी दिसत आहे. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये जमावाच्या गराड्यात सलमान अडकल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्याना सलमानच्या सुरक्षेची काळजी लागली आहे. 

सलमान खान या कार्यक्रमासाठी सुरक्षारक्षकांच्या ताफ्यासह पोहोचला होता. मात्र त्याच्या सुरक्षा रक्षकांना गर्दीतून मार्ग काढणे कठीण होऊन बसले.  सलमान स्टेजवरून उतरताच त्याला चाहत्यांनी घेरले व त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. सुरक्षाकर्मचारी उपस्थित असूनही गर्दी अशी काही वाढली की गोंधळाची स्थिती निर्माण झाली.