जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज मोदींचा वाढदिवस असून देशभरातून नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा

शरद पवार यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे की, “तुमच्या वाढदिवसानिमित्त, मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छा देतो. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो. तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आपल्या देशाची प्रगती सतत होत राहो आणि येणाऱ्या काळात त्याचे अधिकाधिक कल्याण आणि विकास होत राहो, अशी मी प्रार्थना करतो.”

‘सर्व समाज घटकाच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत असणारे आणि देशाला विकासाची नवी दिशा देणारे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!  आपल्या नेतृत्वाखाली भारत आणखी सबल, समृद्ध व आत्मनिर्भर होईल, अशी खात्री आहे. आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.’ असं म्हणतं अजित पवार यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘असंख्य भुजाओं की शक्ति है,

हर तरफ देश की भक्ति है!

    तुम उठो तिरंगा लहरा दो,

    भारत के भाग्य को फहरा दो,

    यही समय है, सही समय है!

    भारत का अनमोल समय है!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कवितेतील या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या ओळी! नव्या भारताचा संकल्प सोडून आदरणीय मोदीजींनी दमदार पावलं  टाकायला सुरवात केली, आणि पुढल्या दहा वर्षात चित्र पालटलं. ज्या भारताला  ‘विकसनशील देश’ म्हणून जागतिक पातळीवर काहीसं हिणवलं जात होतं, त्या  भारताच्या महानतेचा डंका विश्वात वाजतो आहे. अखिल विश्वात भारताचा तिरंगा दिमाखाने फडकवणारे महान नेते आज 75 वर्षांचे तरुण म्हणून तितक्याच उमेदीनं, तडफेनं, जिद्दीनं कार्यमग्न आहे. मोदीजींच्या विकासयात्रेतले आपण सारेच यात्रेकरु आहोत. 2047 सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्याच्या या महान यज्ञात  आपलाही सहभाग असावा, या इराद्यानंच आम्ही त्यांच्यासोबत पावलं टाकत आहोत.  महाराष्ट्र कुठंही मागे पडणार नाही, याची खात्री मी देऊ शकतो.’ अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    राजकीय विरोधक असूनही पवार यांनी दिलेल्या या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी शुभेच्छा देत त्यांनी राजकीय सौजन्य जपले आहे. 

    दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांकडून सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिरांचा समावेश आहे.