मुंबई. नवी मुंबई, पनवेल आणि रायगड परिसरातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना देणाऱ्या पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे 29.6 किलोमीटर लांबीच्या या दुहेरी मार्गिकेवरून लवकरच लोकल सेवा सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2,782 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पामुळे पनवेल, नवी मुंबई, कर्जत आणि रायगड परिसरातील प्रवाशांना पर्यायी उपनगरीय रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (MRVC) या प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. ऑगस्ट 2026 मधील माहितीनुसार, प्रकल्प कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (CRS) तपासणीसाठी 2026 च्या अखेरपर्यंत तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जुलैमध्ये चिखले आणि मोहेपेमधील भुयारी मार्गांचे काम पूर्ण झाले असून, बोगद्यांमधील केबलिंग तसेच ओव्हरहेड विद्युतीकरणाच्या कामालाही वेग आला आहे.
स्थानकांच्या कामाला वेग
या नव्या मार्गिकेवर पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके प्रस्तावित आहेत. यापैकी पनवेल स्थानकाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित स्थानकांवरील किरकोळ कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पूर्वी मोहापे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानकाचे नाव बदलून पोयंजे करण्यात आले आहे. या स्थानकांसह मार्गिकेवरील विविध पूल, रस्ते उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांची कामेही वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत.
पूल आणि भुयारी मार्गांची कामे पूर्ण
नव्या मार्गिकेवर लहान-मोठ्या पुलांसह रेल्वे उड्डाणपूल आणि रस्ते भुयारी मार्गांचा समावेश आहे. पनवेल आणि कर्जतच्या दिशेने असलेले दोन्ही रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाले आहेत. आता या ठिकाणी रूळ जोडणीचे काम सुरू आहे. पुणे द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्गातूनही रूळ जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
जुलै 2026 मध्ये या मार्गिकेवर ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) आणि कॉन्टॅक्ट वायर टाकण्याचे कामही मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्याचबरोबर बोगद्यांमध्ये केबलिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
डोंगरातून धावणार लोकल
पनवेल-कर्जत मार्गिकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन बोगदे आहेत. या तिन्ही बोगद्यांची एकूण लांबी सुमारे 3,164 मीटर आहे. त्यात नाधाळ बोगदा 219 मीटर, वावर्ले बोगदा सुमारे 2,625 मीटर आणि किरवळी बोगदा सुमारे 320 मीटर लांबीचा आहे. वावर्ले बोगदा हा मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे. या बोगद्यांमधूनच नव्या मार्गिकेवरील लोकल धावणार असल्याने पनवेल-कर्जत रेल्वे प्रवासाला नवे स्वरूप मिळणार आहे.
पनवेल-कर्जत प्रवास अधिक वेगवान
सध्याच्या रेल्वे व्यवस्थेच्या तुलनेत नव्या मार्गिकेमुळे पनवेल आणि कर्जतदरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे. या मार्गिकेवर स्वतंत्र उपनगरीय सेवा चालवण्याचे नियोजन आहे. यामुळे मुंबईहून पनवेलमार्गे कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पनवेल, कर्जत, नवी मुंबई आणि रायगड परिसरातील वाढत्या नागरी व औद्योगिक विकासाला रेल्वे कनेक्टिव्हिटीचा आधार मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः नवी मुंबई विमानतळ परिसर आणि NAINA भागासाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
अशी असतील पाच स्थानके
* पनवेल
* चिखले
* पोयंजे (पूर्वी मोहापे)
* चौक
* कर्जत
मार्गावर मुंबईतील सर्वाधिक लांबीचा बोगदा -
पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतील सर्वाधिक लांबीचा बोगदा या मार्गावर तयार केला जात आहे. या नव्या रेल्वे मार्गावर तीन बोगदे तयार केले जात असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा स्थानका दरम्यान सध्या 1.6 किमी पारसिक बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे. मात्र पनवेल - कर्जत दरम्यानच्या वावर्ले येथील 2.6 किमी लांबीचा बोगदा उभारला आहे. हा सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे.
