जेएनएन, मुंबई: ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते.

स्व. आशाताईंनी यांनी संगीत क्षेत्राशी निगडीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

आशा भोसले यांच्याबद्दल माहिती

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांनी 800 हून अधिक चित्रपटांसाठी 12,000 हून अधिक गाणी गायली आहेत. 

    संगीत इतिहासात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी कलाकार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांची नोंद घेतली आहे. त्यांना दादासाहेब फालके पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.