एजन्सी, मुंबई. Landslide in kasara: ठाणे जिल्ह्यातील कसारा स्थानकावर मंगळवारी रात्री आलेल्या उपनगरीय ट्रेनच्या डब्यात दरड कोसळताना (Landslide near Kasara Station) ढिगारा घुसल्याने एक पुरुष प्रवासी जखमी झाला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या (सीआर) अधिकाऱ्याने दिली.
सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी पीटीआयला सांगितले की, मुंबई सीएसएमटीपासून सुमारे 120 किमी अंतरावर असलेल्या कसारा स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर रात्री 9.15 वाजता लोकल ट्रेन प्रवेश करत असताना ही घटना घडली.
जखमी प्रवाशावर स्टेशनच्या ड्युटी कर्मचाऱ्यांनी प्रथमोपचार केले. अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी ट्रॅकची पाहणी केली आणि रात्री 9.35 वाजता तो रेल्वे वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे घोषित केले, असे त्यांनी सांगितले.
निला म्हणाले की, ट्रेनचा मागचा तिसरा डबा घटनास्थळावरून जात असताना दरड कोसळली. ट्रेनचे दरवाजे उघडे होते, त्यात थोडासा चिखल आणि दगड घुसले.
उपनगरीय किंवा लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांमध्ये कोणताही व्यत्यय आला नाही, असेही त्यांनी सांगितले.