जेएनएन, मुंबई: दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता देशातील विविध राज्यांपर्यंत पोहोचली असून, मुंबईतही आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान दादर भागातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये महिला आंदोलकाला पोलिस कर्मचारी जोरजबरदस्तीने पकडून खेचताना दिसत आहे. या व्हिडिओवरून होत असलेल्या विरोधकांच्या टिकेला मुंबई पोलिसांनी उत्तर दिले आहे.

मुंबई पोलिस काय म्हणाले…

आमदार रोहित पवार यांच्या ट्वीटला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या मुंबई पोलिस असे म्हणाले की, “महोदय, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली. एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे.”

रोहित पवार काय म्हणाले होते…

“हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा.. आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला.” असं म्हणत रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्वीट केला होता.