जेएनएन, मुंबई: मुंबईतील रिक्षा प्रवास आता हळूहळू इलेक्ट्रिक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासोबतच रिक्षाचालकांचा इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी उबरने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
उबरने महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीसोबत भागीदारी केली असून, पुढील 12 महिन्यांत देशभरात 5 हजार इलेक्ट्रिक तीनचाकी वाहने उबरच्या प्लॅटफॉर्मवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतही मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक रिक्षा धावणार आहेत. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक रिक्षा खरेदी करण्यासाठी चालकांना कर्जसुविधा, जुन्या वाहनांच्या बदल्यात सवलती आणि वाहन वापराबाबत आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
16 नोव्हेंबर रोजी मुंबईत या भागीदारीची घोषणा करण्यात आली. ‘EV Auto Advantage’ असे या उपक्रमाचे नाव असून, इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना रिक्षाचालकांसमोर येणाऱ्या आर्थिक आणि व्यावहारिक अडचणी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या मुंबईतील बहुतांश रिक्षा सीएनजीवर धावतात. इलेक्ट्रिक रिक्षांची संख्या वाढवण्यासाठी यापूर्वीही काही प्रयत्न झाले होते. मात्र, वाहनांची किंमत, चार्जिंगची सुविधा आणि कर्ज उपलब्धतेच्या अडचणींमुळे येत होती.
चालकांना कर्ज आणि जुन्या वाहनांच्या बदल्यात सवलत
इलेक्ट्रिक रिक्षा खरेदीसाठी मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवावी लागते. त्यामुळे अनेक रिक्षाचालक इच्छा असूनही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन उबर आणि महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीने आर्थिक मदतीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. यामध्ये वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठा, जुन्या वाहनांच्या बदल्यात ट्रेड-इन सवलती आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासंदर्भात मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे.
या माध्यमातून पारंपरिक इंधनावरील रिक्षा वापरणाऱ्या चालकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर कमी असलेल्या शहरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये या योजनेला प्राधान्य दिले जाणार आहे.
रिक्षाचालकांचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न
सीएनजीच्या वाढत्या किमती आणि वाहनांच्या देखभालीचा खर्च यामुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असतो. इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये इंधनाऐवजी वीजेचा वापर होत असल्याने प्रतिकिलोमीटर चालवण्याचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालकांच्या दैनंदिन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष बचत ही वाहनाची किंमत, कर्जाचे हप्ते, चार्जिंगचा खर्च आणि रोजच्या प्रवासाच्या अंतरावर अवलंबून असणार आहे.
महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा यांनी सांगितले की, शाश्वत वाहतूक व्यवस्था विकसित करायची असेल, तर इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय चालक आणि उद्योजकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणे आवश्यक आहे. या भागीदारीतून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यास मदत होणार आहे.
उबरचे ग्लोबल हेड ऑफ मोबिलिटी प्रदीप परमेश्वरन यांनीही इलेक्ट्रिक वाहतुकीमुळे व्यवसाय, प्रवासी, शहरे आणि समाजाला दीर्घकालीन फायदे मिळू शकतात, असे ही सांगितले आहे.
