मुंबई. Mumbai News: मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवासात गर्दी ही काही नवीन बाब नाही. मात्र, गर्दीचे योग्य नियोजन नसेल, तर हीच गर्दी कधी जीवघेणी ठरू शकते, याची आठवण करून देणारी परिस्थिती सध्या मध्य रेल्वेच्या मशीद स्थानकावर पाहायला मिळत आहे. एकच फलाट, फलाटाच्या दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या लोकल आणि स्थानकात प्रवेश करण्यासाठी तसेच बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असलेला एकमेव पादचारी पूल यामुळे या स्थानकावर प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे.गर्दीच्या वेळेत पुलावरून मार्ग काढणेही प्रवाशांसाठी जिकिरीचे ठरत आहे. या परिस्थितीमुळे पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात घडलेल्या भीषण चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
सणासुदीच्या काळात खरेदीसाठी दक्षिण मुंबईत येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते. त्यात नियमित रेल्वे प्रवाशांची भर पडल्याने मशीद स्थानकावरील गर्दी आणखी वाढते. स्थानकात येणारे आणि बाहेर पडणारे प्रवासी एकाच पुलाचा वापर करत असल्याने अनेकदा पुलावर गर्दीचा मोठा ताण निर्माण होतो. एकाच वेळी दोन्ही दिशांनी प्रवाशांची ये-जा सुरू असल्याने पादचारी पुलावरून चालणेही कठीण होते. अशा वेळी एखादी अफवा पसरली, अचानक धावपळ सुरू झाली किंवा एखादी अनुचित घटना घडली, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एल्फिन्स्टन दुर्घटनेची आठवण
२९ सप्टेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर झालेली चेंगराचेंगरी मुंबईकरांच्या स्मरणात आजही कायम आहे. पावसामुळे पुलावर गर्दी झाली असताना फूल पडल्याच्या अफवेचे रूपांतर पुलाबाबतच्या अफवेत झाले. त्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट आणि धावपळ उडाली. या दुर्घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३९ जण जखमी झाले होते. गर्दी, अपुरी जागा आणि अफवेमुळे निर्माण झालेली घबराट किती भयानक ठरू शकते, हे या दुर्घटनेने दाखवून दिले होते.
मशीद स्थानकावरही तीच परिस्थिती
मशीद स्थानकावरील सध्याची परिस्थिती पाहता, गर्दीच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांची क्षमता, पर्यायी मार्ग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, मशीद स्थानकावरील गर्दी पाहता त्या अनुभवातून पुरेसे धडे घेतले गेले आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या मशीद स्थानकावर या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची किंवा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समित्या नेमणे, जबाबदारी निश्चित करणे आणि उपाययोजनांची घोषणा करण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज आहे.
पर्यायी मार्ग आणि गर्दी व्यवस्थापनाची गरज
मशीद स्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता अतिरिक्त पादचारी पूल, प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था, गर्दीच्या वेळेत प्रवाशांच्या हालचालींचे नियोजन आणि आवश्यक ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती अशा उपाययोजनांचा विचार होणे गरजेचे आहे.सणासुदीच्या काळात आणि कार्यालयीन गर्दीच्या वेळेत पुलावर होणारी कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र नियोजन आवश्यक आहे.
