मुंबई. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मुंबईतील मंत्रालय परिसरातील ‘पावनगड’ या शासकीय बंगल्याला आग लागल्याची घटना घडली. सकाळच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात आले.

गणेश नाईक यांच्या शासकीय निवासस्थानाला आग लागल्याची बातमी समोर येताच मंत्रालय परिसरात खळबळ उडाली. बंगल्यातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याची माहिती समोर आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम हाती घेतले.

एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता

माहितीनुसार, बंगल्यातील एअर कंडिशनरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात असल्याची माहिती आहे.

जीवितहानीची माहिती नाही

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीमुळे बंगल्याचे किती नुकसान झाले, याबाबतही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. आग नेमकी कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले, याचा तपशील अधिकृत माहितीनंतर स्पष्ट होणार आहे.