मुंबई. Mumbai local Mega Block: रविवारच्या सुट्टीच्या दिवशी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी रोजी मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा परिणाम अनेक लोकल सेवांवर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या लोकलचे वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करावे.

रविवारच्या दिवशी नोकरदार प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याने रेल्वेकडून अनेकदा देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. त्यानुसार 27 सप्टेंबरला मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

माटुंगा-मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात जलद मार्गावरील लोकलच्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

सीएसएमटीहून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान निर्धारित स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे त्या पुन्हा डाऊन जलद मार्गावर आणल्या जाणार आहे. त्यामुळे या लोकल त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

तसेच ठाण्याहून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा येथे पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

    खोपोली-सीएसएमटी लोकलच्या वेळेत बदल

    मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर खोपोलीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या एका लोकलच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. खोपोलीहून दुपारी 1.48 वाजता सुटणारी लोकल आता दुपारी 2.06 वाजता सुटणार आहे. 

    हार्बर लाईनवरही मेगाब्लॉक

    हार्बर लाईनवरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी  11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे.

    या कालावधीत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेतील सेवा रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 या कालावधीतील अप हार्बर सेवा रद्द करण्यात येणार आहेत. 

    प्रवाशांसाठी विशेष सेवा

    प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेलदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.

    याशिवाय ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील लोकल सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ठाणे-वाशी/नेरुळमार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.