मुंबई. Mumbai-Goa Highway Traffic: दिवाळीचा सण आणि भाऊबीजेच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या तसेच सुट्ट्या संपवून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. दोन्ही दिशांना सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पुण्यातून मोठ्या संख्येने नागरिक कोकणातील आपल्या गावी गेले आहेत. भाऊबीजेच्या निमित्ताने अनेक जण प्रवास करत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. मुंबई-पुण्यातून कोकणाकडे जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या वाहनांची एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने माणगाव परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

तासन्‌तास वाहनांच्या रांगेत अडकले प्रवासी-

माणगावमध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी मोठा वेळ लागत आहे. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही वाहनचालकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. कुटुंबासह प्रवास करणारे नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना या कोंडीचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना प्रवासातच तासन्‌तास अडकून राहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षी सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. यंदाही भाऊबीजेच्या दिवशी त्याची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र आहे.

महामार्गावरील कोंडीमुळे प्रवासाचे नियोजन कोलमडले-

    मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी माणगाव हा महत्त्वाचा मार्गावरील टप्पा आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही दिशांच्या वाहतुकीवर होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात निर्माण झालेल्या या कोंडीमुळे प्रवाशांचे प्रवासाचे नियोजनही कोलमडले आहे.

    दरम्यान, महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन आणि वाहनांच्या रांगा कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दिवाळीच्या सणानंतर पुन्हा कामावर परतणाऱ्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे.