जेएनएन, मुंबई: कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि गेल्या 17 वर्षांपासून रखडलेली प्रतीक्षा आता संपण्याच्या दिशेने आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महामार्गावरील विविध कामांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. महामार्गाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला सूचना देण्यात आल्या असून, पुढील सहा महिन्यांत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे भोसले यांनी सांगितले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. महामार्गावरील अनेक उड्डाणपूल आणि महत्त्वाचे रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. आतापर्यंत महामार्गावरील पाच उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. आता चिपळूणचा महत्त्वाचा उड्डाणपूल गणेशोत्सवापूर्वी पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नागोठणेच्या पुलावरून लहान वाहनांची वाहतूक सुरू
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे बंद असलेल्या पुलावरून लहान वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागोठणे परिसरात गेल्या काही काळापासून वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत होते . नवीन रस्ते आणि पुलांची कामे सुरू असतानाच वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत.
गणेशोत्सवापूर्वी चिपळूणचा पूल सुरू करण्याचे लक्ष्य
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाणपूल हा कोकणातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या पुलाचे काम काही काळ विविध कारणांमुळे रखडले होते. मात्र, आता कामाला वेग देण्यात आला असून गणेश चतुर्थीपूर्वी हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
माणगाव बायपासलाही गती
महामार्गावरील माणगाव-इंदापूर बाह्यवळण मार्गाचे कामही महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. गणेशोत्सवाच्या काळात माणगाव शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपासची किमान एक मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले आहे.
17 वर्षांपासून रखडलेला महामार्ग
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हा कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम अनेक वर्षे रखडले. 2026 मध्येही महामार्गावरील काही भागांमध्ये कामे अपूर्ण असल्याने प्रवाशांना खड्डे, वाहतूक कोंडी आणि एकेरी वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता सरकारने उर्वरित कामांना वेग देण्यावर भर दिला आहे.
कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार?
मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी आणि उन्हाळी सुट्यांमध्ये मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फायदा होऊ शकतो.
