मुंबई- Anant Chaturthi 2026: लालबागच्या गणेशगल्लीतील प्रसिद्ध ‘मुंबईचा राजा’ यंदा अनोख्या आणि ऐतिहासिक पद्धतीने निरोप घेणार आहे. गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या 22 फूट उंच भव्य गणेशमूर्तीचे यंदा प्रथमच गिरगाव चौपाटीवरून अत्याधुनिक बार्ज जहाजाच्या माध्यमातून थेट खोल समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात यंदाच्या विसर्जन सोहळ्याची विशेष नोंद होणार आहे.
आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मंडळाच्या नियोजनानुसार सकाळी आरतीनंतर बाप्पाला विसर्जनासाठी मार्गस्थ करण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार शेवटची महाआरती सकाळी 7 वाजता पार पडली आहे.
लालबाग ते गिरगाव चौपाटी पारंपरिक मार्ग
मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक लालबाग येथून सुरू होऊन पारंपरिक मार्गाने गिरगाव चौपाटीकडे रवाना होणार आहे. मिरवणुकीदरम्यान मोठ्या संख्येने भाविक आणि गणेशभक्त सहभागी होण्याची शक्यता आहे. गणेशगल्लीतील ‘मुंबईचा राजा’ हा मुंबईतील जुन्या आणि मानाच्या सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक असून मंडळाची स्थापना 1928 मध्ये झाली आहे.
पहिल्यांदाच बार्जमधून खोल समुद्रात विसर्जन
यंदाच्या विसर्जन सोहळ्याचे सर्वाधिक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 22 फूट उंच मूर्तीचे बार्ज जहाजाच्या माध्यमातून खोल समुद्रात विसर्जन. गिरगाव चौपाटीवर मूर्ती बार्जवर नेण्यात येईल. त्यानंतर बार्ज समुद्रात पुढे नेऊन मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. हा प्रयोग यापूर्वीच्या पारंपरिक विसर्जन पद्धतीपेक्षा वेगळा असल्याने भाविकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
रात्री 8 ते 11 दरम्यान विसर्जन सोहळा
या विशेष विसर्जनासाठी आज सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या नियोजनाला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेची मान्यता असल्याचेही माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून परवानगीबाबत चर्चा सुरू होती. मात्र अखेर विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
99व्या वर्षात अनोखा निरोप
गणेशगल्लीतील ‘मुंबईचा राजा’ यंदा ९९व्या वर्षात आहे. मंडळाने १९७७ पासून २२ फूट उंच गणेशमूर्तीची परंपरा सुरू केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे यंदाच्या २२ फुटी मूर्तीला समुद्रात बार्जच्या माध्यमातून निरोप देण्याचा निर्णय या परंपरेच्या पार्श्वभूमीवर विशेष ठरत आहे.
दरम्यान, आज मुंबईसह राज्यभरात अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडून विविध ठिकाणी वाहतूक, सुरक्षा आणि विसर्जन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या राजाच्या ऐतिहासिक विसर्जनाकडे गणेशभक्तांचे विशेष लक्ष लागले आहे.
