मुंबई. Mumbai Mayor Election: मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या 11 तारखेला मुंबईला नवा महापौर मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, 7 तारखेला महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

महापालिकेतील सत्तास्थापनाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महापौरपदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मुंबई महापालिकेसंदर्भात महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत महापौरपदाचा फॉर्म्युला, पक्षीय भूमिका आणि उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील घटक पक्षांमध्ये महापौरपदावरून चर्चा सुरू असून, जागावाटप आणि सत्तेतील सहभागाबाबत सखोल चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते, त्यामुळे या पदाला विशेष राजकीय महत्त्व आहे.

7 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर, 11 तारखेला प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी नव्या महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. निवडणूक बिनविरोध होणार की मतदानाद्वारे, याकडेही मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबईच्या कारभारावर प्रभाव टाकणाऱ्या या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणातही हालचाली वाढले आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतरच महापौरपदाच्या उमेदवाराबाबत स्पष्ट चित्र होणार आहे.