जेएनएन, मुंबई:  खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या 200 अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये 170 आसनी आणि 30 शयनयान बसेसचा समावेश असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्हल्वो बसेस समाविष्ट होत आहेत.

मंत्री सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने ठेवले आहे. 

दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा

250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी 45 आसनी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 30 किंवा 45 शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मोबाईलवरून तिकीट बुकिंग; खासगी ॲपवरही आरक्षणाची सुविधा

नव्या आराम बससेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच  खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बससेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.

    ‘लालपरी’चा आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय 

    ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे घोषवाक्य अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एसटी महामंडळाची ताकद म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विस्तृत जाळे आणि प्रवाशांचा असलेला विश्वास. या विश्वासाला आधुनिक सुविधा, डिजिटल आरक्षण व्यवस्था आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

    नव्या व्होल्वो बसेसमुळे एसटीच्या सेवेला आधुनिकतेची जोड मिळणार असून, आरामदायी, सुरक्षित, विश्वासार्ह आणि डिजिटल सुविधा असलेला प्रवास प्रवाशांसमोर उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि एसटीवरील विश्वास यांच्या बळावर लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत ‘लालपरी’ आता नव्या दमाने, नव्या रूपात आणि नव्या अनुभवासह सज्ज होत आहे.