जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यानंतर आयोगाने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आयोगाने २९ जुलै २०२५ रोजी औषध निरीक्षक पदासाठी जाहिरात क्रमांक ११६/२०२५ प्रसिद्ध केली होती. त्यानुसार २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता.
५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र
चाळणी परीक्षेनंतर एकूण ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. मुलाखती पूर्ण झाल्यानंतर २२ जुलै रोजी औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या ४८५ आणि अपात्र ठरलेल्या तीन, अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
प्रश्नपत्रिका आधीच मिळाल्याचा तक्रारीत दावा
दरम्यान, २२ मार्च रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी २२ ते २६ जुलैदरम्यान आयोगाला काही उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींकडून ई-मेलद्वारे प्राप्त झाल्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच, २० मार्च रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाले होते आणि ते सोशल मीडिया अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याचा दावा या तक्रारींमध्ये करण्यात आला होता.
तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने २७ जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे चौकशीसाठी तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी करून आयोगाला अहवाल सादर केला.
एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट
प्राथमिक चौकशी अहवालानुसार, एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे परीक्षेची गोपनीयता, पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण झाले.
आयोगाच्या परीक्षांची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम राखणे तसेच उमेदवारांचा आयोगावरील विश्वास अबाधित ठेवणे या उद्देशाने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
फेरपरीक्षा होणार; उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही
या पदांसाठी आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
फेरपरीक्षेची तारीख आणि त्यासंदर्भातील इतर तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.
