जेएनएन, मुंबई: नवविवाहितांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. आता विवाह नोंदणीसाठी आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार आणि रविवारीसुद्धा सुविधा उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘वीकेण्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस’ सुरू करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना ही सर्विस मोठी सोयची ठरणार आहे.
नोंदणीची नवी सुविधा
आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी (शनिवार-रविवार) विवाह नोंदणी करण्याची सुविधा.
नोंदणी केल्यानंतर त्याच दिवशी विवाह प्रमाणपत्र दाम्पत्याला दिले जाणार आहे.
सोमवार ते शुक्रवार दरम्यान होणाऱ्या नोंदणींपैकी 20 टक्के नोंदणी “फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन” म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे.
मुंबईसारख्या महानगरात कामकाजाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी विवाह नोंदणी करणे कठीण जाते. यामुळेच पालिकेने शनिवार-रविवारी विशेष सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कामावर परिणाम न होता दाम्पत्यांना त्यांच्या सोयीने नोंदणी करता येणार आहे.
त्वरित प्रमाणपत्र वितरण
यापूर्वी नोंदणी झाल्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र नव्या निर्णयामुळे नोंदणीच्या दिवशीच अधिकृत विवाह प्रमाणपत्र दाम्पत्याला मिळणार आहे. यामुळे पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर शासकीय कामांसाठी तातडीने प्रमाणपत्र आवश्यक असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.