जेएनएन, मुंबई. Maratha Reservation News: मराठा समाजातील पात्र लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबीतून आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या हैदराबाद गॅझेटियरच्या (Hyderabad Gazette) अंमलबजावणी विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. 

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाला न्यायालयीन स्थैर्य मिळाल्याचे मानले जात आहे. यामुळे मराठा समाजातील ज्या लोकांची नोंद हैदराबाद गॅझेटमध्ये ‘कुणबी’ म्हणून आहे, त्यांना आता कुणबी जातीचे प्रमाणपत्र सहज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

काय आहे हैदराबाद गॅझेट? 

हैदराबाद संस्थानातील 1918 मधील गॅझेटमध्ये मराठवाड्यातील काही गावे आणि व्यक्तींची नोंद ‘कुणबी’ म्हणून करण्यात आली होती. ही नोंद आज ऐतिहासिक पुरावा मानून महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर 2025 मध्ये GR काढत मराठा समाजातील पात्रांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला.

विरोधकांचा आक्षेप

ओबीसी समाजातील काही संघटनांनी या GR ला जोरदार विरोध केला आहे. मराठा समाजाला अशा प्रकारे कुणबी वर्गात समाविष्ट केल्यास इतर ओबीसी समाजाच्या आरक्षणातील वाटा कमी होईल असा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर दाखल याचिकांना आज हायकोर्टाने ग्राह्य धरले नाही.