जेएनएन, मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आजपासून जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता उपोषण सुरू होणार असून, त्यासाठी मराठा आंदोलकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोठ्या आंदोलनाची तयारीही सुरू करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या वतीने मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले असून, आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पत्रात आंदोलनाची निश्चित तारीख नमूद करण्यात आलेली नाही. आंदोलनाची तारीख लवकरच कळवण्यात येईल, असा उल्लेख पत्रात करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतील आंदोलनानंतर मुंबईत पुन्हा मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अंतरवाली सराटी येथे आजपासून त्यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागांतून मराठा समाजातील कार्यकर्ते आणि आंदोलक अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मोठी तयारी करण्यात आली आहे. जरांगे यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ही मराठा समाजासाठी शेवटची लढाई असल्याचे सांगत त्यांनी समाजातील नागरिकांनी घरात बसून न राहता आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
58 लाख नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राची मागणी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. उपलब्ध 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच जातपडताळणी प्रक्रियेत नाकारण्यात आलेली प्रमाणपत्रेही पुन्हा विचारात घेऊन संबंधितांना प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. या मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.
जरांगेंना पोलिसांची प्रतिबंधात्मक नोटीस
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मनोज जरांगे यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
अंतरवाली सराटीत आंदोलकांची वाढती गर्दी आणि मुंबईत आंदोलनाची संभाव्य तयारी यामुळे पोलिस-प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन
दरम्यान, अंतरवाली सराटीतील आंदोलनानंतर पुढील दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे. मात्र, आंदोलनाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. “आंदोलनाची तारीख लवकरच कळवण्यात येईल,” असा उल्लेख पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather: महाराष्ट्रात सप्टेंबरच्या सुरुवातीला पुन्हा जोर वाढण्याची शक्यता, विदर्भाला आज पावसाचा इशारा
