जेएनएन, मुंबई. MLA Sanjay Gaikwad: आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना समज दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण मारहाणीचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार संजय गायकवाड यांना आमदार निवासमधील कॅन्टीनचे निकृष्ट जेवण खाल्ल्याने उलटी झाली होती. इतरांना त्रास होऊ नये यासाठी आमदार गायकवाड यांनी त्वरीत कॅन्टीनमध्ये धाव घेत अन्नाच्या दर्जाबाबत चौकशी केली.

याबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले की, संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण समर्थनीय नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने अन्नाच्या दर्जाबाबत रितसर तक्रारी करुन त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, पण मारहाण करणे हा पर्याय असू शकत नाही. संजय गायकवाड यांना समज दिली असून असं करणं योग्य नाही, आम्ही याचं समर्थन करत नाही" हे सांगितल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आमदारांच्या प्रतिष्ठेला कलंक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आणि म्हटले की, या प्रकारचे वर्तन अस्वीकार्य आहे आणि कोणासाठीही आदरणीय नाही. आमदार म्हणून गायकवाड यांच्या कृत्याने सर्व आमदारांच्या प्रतिष्ठेला कलंक लावला आहे, लोकप्रतिनिधींमध्ये जबाबदारीची गरज असायला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.