मुंबई: Maharashtra municipal election result 2026 : बराच वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आता समोर आले आहेत. या निकालाने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील ठाकरेंची सत्ता 25 वर्षानंतर भुईसपाट झाली असून येथे पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. मुंबईसह अन्य महापालिकांतही भारतीय जनता पक्षाने वर्चस्व गाजवत विरोधकांना धूळ चारली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची एकी होऊनही त्यांना भाजपला रोखता आलेले नाही. 29 महापालिकांपैकी भाजपने मुंबईसह राज्यातील तब्बल 21 महापालिकांवर झेंडा फडकवला आहे. 

या निवडणुकीत फार काही प्रयत्न व मेहनत न करताही काँग्रेसला थोडंफार यश मिळालं आहे. कोल्हापुरात काँग्रेसची सत्ता थोडक्यात हुकली. येथे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीला रोखले होते मात्र केवळ तीन जागा कमी पडल्याने त्यांना सत्ता हस्तगत करत आली नाही. शिवसेना शिंदे गटाने आपला बालेकिल्ला मानले जाणारे ठाणे व कल्याण डोंबिवली राखली आहे. 

राज्यात भाजपची लाट, 21 महापालिकांत फुलले कमळ -

नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच भाजपने महापालिकेतही आपले वर्चस्व राखल मुंबईसारख्या  हायप्रोफाईल महापालिकेत सत्ता मिळवली आहे. मुंबई महापालिकेसह पुणे, नागपूर आणि नाशिक या मोठ्या शहरांमध्येही भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे.

भाजपने खालील महापालिकांमध्ये सत्ता मिळवली -

  • मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, 
  • पुणे, पिंपरी चिंचवड, 
  • इचलकरंजी, सांगली मिरज कुपवाड, कोल्हापूर, सोलापूर, 
  • नागपूर, अकोला, अमरावती, 
  • नाशिक, धुळे, जळगांव, 
  • अहिल्यानगर (अहमदनगर), 
  • जालना, नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर.

शिंदेच्या शिवसेनेने जिंकलेल्या महापालिका -

    ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यांमध्ये वर्चस्व टिकवून ठेवले आहे. या दोन महत्त्वाच्या महापालिकांवर शिवसेनेचा भगवा कायम आहे.

    काँग्रेसची सत्ता कोणत्या महापालिकांवर - 

    काँग्रेसला केवळ 3 महापालिकांमध्ये यश मिळाले आहे. यामध्ये लातूर आणि भिवंडी निजामपूरमध्ये त्यांनी स्वबळावर, तर चंद्रपूरमध्ये शिवसेना (UBT) च्या साथीने सत्ता स्थापन केली आहे.

    शिवसेना ठाकरे गट -

    उद्धव ठाकरे यांच्या गटाला परभणीमध्ये यश मिळाले आहे, तिथे त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता मिळवली आहे.

    बहुजन विकास आघाडीने आपलं अस्तित्व टिकवत वसई-विरार महापालिकेवर पुन्हा एकदा पकड मजबूत केली आहे. 

    मालेगावमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नाही - 

    मालेगाव महानगरपालिकेचा निकाल त्रिशंकू लागला आहे. येथे कोणत्याही प्रमुख पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. येथे अपक्षांची भूमिका म्हत्वपूर्ण ठरणार आहे.