जेएनएन, मुंबई. Maharashtra Monsoon Session 2026: राज्यातील ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्सबारना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डान्सबार विरोधी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. हा विधेयक गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात मांडला आहे.
सध्याच्या व्यवस्थेनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत बारमधील ऑर्केस्ट्रा सादरीकरणांना परवानगी दिली जात होती. मात्र, या परवानगीचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होते. यामुळे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
याच पार्श्वभूमीवर सरकारने डान्सबार विरोधी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. या दुरुस्तीनंतर ऑर्केस्ट्रा सादरीकरणांनाही डान्सबार विरोधी कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या आडून डान्सबार चालविणाऱ्यांवर थेट कारवाईचा मार्ग मोकळा होणार असून अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यास प्रशासनाला अधिक सक्षम कायदेशीर आधार मिळणार आहे.
सरकारच्या मते, या बदलामुळे परवानाधारक ऑर्केस्ट्रा आणि बेकायदेशीर डान्सबार यांच्यातील फरक स्पष्ट होईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करणे शक्य होईल.
विधानसभेत मंजूर झालेल्या या विधेयकाला आता विधान परिषदेचीही मंजुरी आवश्यक आहे. दोन्ही सभागृहांतून विधेयक मंजूर होऊन राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
ऑर्केस्ट्रा परवान्याच्या गैरवापरावर कठोर कारवाई; सुधारणा विधेयकाला सभागृहाची मंजुरी!
— Vikram Pachpute (@VikramPachpute_) July 7, 2026
📍विधानभवन, मुंबई
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान ऑर्केस्ट्राच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या परवान्यांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्रासाठी… pic.twitter.com/lfDD5WHaEN
या सुधारणेमुळे राज्यातील बार आणि ऑर्केस्ट्रा व्यवसायासाठी नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता असून, बेकायदेशीर डान्सबारविरोधातील कारवाई अधिक प्रभावी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
