जेएनएन, मुंबई: राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांनी तयारीचा वेग वाढवला आहे.
स्थानिक पातळीवर उमेदवारांच्या निवडीसाठी बैठकींचा आणि चर्चांचा धुरळा उडाला आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब केले आहे.
संध्याकाळी उशिरा AB फॉर्म
माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली. उमेदवारांची छाननी, स्थानिक स्तरावरील मतमतांतरं आणि गटबाजी यांचा विचार करून ही यादी तयार करण्यात आली आहे. संध्याकाळी उशिरा AB फॉर्म संबंधित जिल्हा पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती पक्षाकडून मिळाली आहे.
स्थानिक स्तरावर रंगत वाढली
राज्यातील अनेक ठिकाणी भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी मात्र शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये जागावाटपावरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दोन्ही पक्ष आमनेसामने लढताना दिसणार आहेत.
त्याचवेळी, कोल्हापुरात अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांनी एकत्र लढायचं ठरवले असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
