मुंबई. Ladki Bahin Yojana e-kyc : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून e-KYC पोर्टल बंद असल्याने अनेक लाडक्या बहिणींचे मानधन अडकले होते. मात्र आता महिला व बालविकास विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत e-KYC पोर्टल पुन्हा सुरू केले आहे.
e-KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे हजारो महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये मोठी नाराजी होती. अखेर या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
31 मार्चपर्यंत e-KYC करण्याची मुदत!
महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता लाभार्थी महिलांना 31 मार्चपर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या कालावधीत e-KYC पूर्ण करणाऱ्या पात्र महिलांना योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेले मानधन लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा!
e-KYC पोर्टल सुरू झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन आणि वेळेअभावी e-KYC न झालेल्या महिलांना आता पुन्हा एक संधी मिळाली आहे.
प्रशासनाचे आवाहन!
प्रशासनाकडून लाभार्थी महिलांना आवाहन करण्यात आले आहे की, अखेरच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून पुढील हप्ते वेळेत मिळू शकतील.
