जेएनएन, नवी मुंबई. नवी मुंबईतील उपनगरीय रेल्वेने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांना स्थानकांवर मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. अनेक रेल्वेस्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्टची व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग, आजारी व्यक्ती तसेच गुडघेदुखीचा त्रास असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. फलाटावर जाण्यासाठी स्थानकाबाहेर पडण्यासाठी प्रवाशांना तब्बल 25 ते 30 पायऱ्या चढाव्या-उतराव्या लागत असल्याने रेल्वेचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच अनेकांची दमछाक होत आहे.

नवी मुंबईचा विस्तार झपाट्याने होत असून लोकसंख्येबरोबरच रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढत आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण अन्य कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक रेल्वेने मुंबई, ठाणे आणि पनवेलच्या दिशेने प्रवास करतात. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेस्थानकांवरील पायाभूत सुविधांचा विस्तार अपेक्षित वेगाने होत नसल्याचे चित्र आहे. स्थानकांवरील जिन्यांचा वापर करताना शारीरिक अडचणी असलेल्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांची सर्वाधिक गैरसोय 

रेल्वेस्थानकांवर सरकते जिने किंवा लिफ्ट उपलब्ध नसल्याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. वयामुळे अनेकांना जिने चढणे-उतरणे कठीण जात आहे. गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा अन्य आजार असलेल्या व्यक्तींना प्रत्येक पायरी चढताना वेदना सहन कराव्या लागत आहे. गर्भवती महिलांनाही अशा परिस्थितीत जिन्यांचा वापर करणे जिकिरीचे ठरत आहे. लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या महिला, सामान घेऊन जाणारे प्रवासी आणि आजारी व्यक्तींनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. 

काही स्थानकांवर फलाट बदलण्यासाठी स्थानकाबाहेर जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करावा लागतो. त्यामुळे जिने चढणे टाळण्याचा पर्याय अनेकदा उपलब्ध राहत नाही.गर्दीच्या वेळेत जिन्यांवरून ये-जा करताना प्रवाशांची अधिकच कोंडी होत आहे. घाईच्या वेळी ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक अडचणी असलेल्या प्रवाशांना गर्दीतून मार्ग काढणेही अवघड जात आहे. 

अनेक वर्षांपासून मागणी, मात्र ठोस कार्यवाहीची प्रतीक्षा

    नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट बसवावे, अशी मागणी प्रवाशांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व वयोगटांतील नागरिकांना सहज सुरक्षितपणे फलाटावर पोहोचता यावे, यासाठी या सुविधा आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही अनेक ठिकाणी अद्याप या सुविधांची उपलब्धता झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.