जेएनएन, सिंधुदुर्ग: जिल्ह्यात होळी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 1136 ठिकाणी होळीचे पूजन होणार आहे. काही गावांत मानपानावरून वाद होण्याची शक्यता असल्याने अशा गावांत पोलिस प्रशासनाकडून निर्बंध घातले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीचा होळी उत्सव आजपासून (ता. 2) सुरू होत आहे. काही गावात पाच दिवस, सात दिवस, तर त्यापेक्षाही अधिक दिवस हा होळी उत्सव साजरा केला जातो.

काही गावात प्रशासनाने निर्बंध घातले 

या वर्षी जिल्ह्यात 538 ठिकाणी सार्वजनिक तर 598 ठिकाणी खासगी अशा एकूण 1136 ठिकाणी होळीचे पूजन केले जाणार आहे. काही गावात मानपानावरून वाद होण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. वाद मिटविण्याच्या दृष्टीने पोलिस आणि महसूल प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. 

कोणत्या ठिकाणी किती होणार सार्वजनिक होळी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक होळ्यांमध्ये दोडामार्ग 52, बांदा 26, सावंतवाडी 40, वेंगुर्ले 27, निवती 12, कुडाळ 91, सिंधुदुर्ग 9, मालवण 59, आचरा 21, कणकवली 67, देवगड 67, विजयदुर्ग 25, वैभववाडी 38, अशा 538 ठिकाणी सार्वजनिक होळीचे पूजन होणार आहे.