मुंबई - मुंबईत 9 दिवस मांसविक्री बंद करण्याची मागणी करणारी जैन समाजाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबईत 9 दिवस मांस विक्रीवर बंदी होणार नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
जैन समाजाचे पर्युषण पर्व सुरू झाले आहे. या काळात 9 दिवस कत्तलखाने बंद करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. जैन समाजाच्या वतीने दाखल केलेली याचिका मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली होती. मात्र, न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. या विषयावर कायदेशीर चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागेल. नऊ दिवसांची बंदी लागू करण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत, असे स्पष्ट मत न्यायालयाने दिले आहे.
काय होती जैन समाजाची मागणी -
जैन समाजासाठी पर्युषण पर्व हा अतिशय पवित्र काळ मानला जातो. त्यामुळे 20 ते 28 ऑगस्ट दरम्यान मुंबईतील सर्व कत्तलखाने आणि मांसविक्री बंद ठेवण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती.
न्यायालयातील सुनावणी -
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी धार्मिक भावनांचा विचार करून ही मागणी योग्य असल्याचे सांगितले. तर, मुंबई महानगरपालिका (BMC) आणि अन्य विरोधकांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, मुंबईसारख्या बहुधर्मीय शहरात सलग 9 दिवस मांसविक्री बंद करणे योग्य नाही.अशा बंदीमुळे नागरिकांच्या आहार स्वातंत्र्यावर गदा येईल. यापूर्वी प्रतीकात्मक स्वरूपात 2 चार दिवसांची बंदी लागू केली गेली होती. परंतु सलग ९ दिवस बंद ठेवणे अव्यवहार्य ठरेल. यामुळे सलग 9 दिवस मांस विक्रीवर बंदी घालता येणार नाही.
न्यायालयाचा निर्णय -
सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की धार्मिक श्रद्धेला मान देतानाच इतर समुदायांच्या हक्कांचाही विचार करणे गरजेचे आहे. सलग 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय तर्कसंगत नाही, असे मत न्यायालयाने मांडले आहे.
हे ही वाचा -Maharashtra Police Recruitment 2025: लागा तयारीला! 15,631 पोलिसांची भरती होणार, शासन निर्णय निघाला