एजन्सी मुंबई: आयपीएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची जेव्हा पासून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे, तेव्हापासून राज्यात धाड आणि कारवायांचे सत्र सुरु आहे. यातच मुंबईतील केईएम रुग्णालयात चालणाऱ्या एका कॅन्टीनची तपासणी केली असता, अस्वच्छ परिस्थिती आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्या कॅन्टीनचा परवाना निलंबित केला असून, व्यवसाय थांबवण्याचे आदेश दिले आहेत, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

एफडीएच्या झोन 3 टीमने 15 जुलै रोजी केलेल्या तपासणीनंतर, परळ येथील केईएम हॉस्पिटलमधील जुन्या नर्सेस होम इमारतीच्या तळमजल्यावरून व्यवसाय चालवणाऱ्या मेसर्स स्टॅनी केटरर्स यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल हे 1926 मध्ये स्थापन झालेले एक सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी (MUHS) संलग्न आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अस्वच्छ परिस्थिती आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा (FSSA) तसेच संबंधित नियमांमधील तरतुदींचे उल्लंघन आढळल्यानंतर कॅन्टीनचे कामकाज थांबवण्यात आले.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून व्यवसाय थांबवण्याची नोटीस जारी करण्यात आली, तर नियुक्त अधिकाऱ्याकडून अन्न व्यवसायाचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला. 

तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी अन्नाचे चार अधिकृत नमुने गोळा केले. नमुन्यांमध्ये तयार भात, मिश्र डाळींची भाजी, कच्चा माल म्हणून वापरलेले काबुली चणे आणि शुद्ध केलेले सूर्यफूल तेल यांचा समावेश होता. 

    मे महिन्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्र एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून खाद्य व्यवसायांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर तपासणी करण्यात आली आहे.

    अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यानंतर एफडीएने मुंबईस्थित पारसी डेअरी फार्मचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.