जेएनएन, मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्या ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ या निवडणूक चिन्हाला अखेर निवडणूक आयोगाने कायमचे रद्दबातल ठरवले आहे. आयोगाच्या या निर्णयाचं शरद पवार गटाने स्वागत केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानले जातं आहे.

गोंधळातून मोठं नुकसान
मागील काही निवडणुकांमध्ये ‘पिपाणी’ या चिन्हामुळे अनेक मतदारांना भ्रम निर्माण झाला होता. काही मतदारांनी एकाच नावाच्या किंवा साधर्म्य असलेल्या चिन्हांच्या उमेदवारांना मतदान केल्याने, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा  नुकसान झाले होते. दरम्यान राज्याच्या काही मतदारसंघांमध्ये या गोंधळाची राजकीय किंमत शरद पवार यांच्या पक्षाला चुकवावी लागली.

आयोगाचं धोरण
निवडणूक आयोगाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “मतदारांची दिशाभूल होऊ नये, म्हणून साधर्म्य असलेली चिन्हे टप्प्याटप्प्याने वगळण्यात येत आहेत. निवडणुकीत प्रत्येक मतदाराला स्पष्ट पर्याय मिळावा, हे आयोगाचं प्राधान्य आहे.”

पक्षांकडून स्वागत
शरद पवार गटाकडून आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘शेवटी उशिरा का होईना, सुचलेलं शहाणपण!’ अशी  प्रतिक्रिया शरद पवार गटाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? अजित पवारांचा अर्थपूर्ण इशारा; युतीबाबत कार्यकर्त्याला सर्व अधिकार