मुंबई. ZP Election 2026: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा प्रचार गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी थंडावला व आता शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानाची सर्व तयारी झाली असून मतदान याद्याही अद्ययावत झाल्या आहेत. मात्र काहींना त्यांचे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा मतदारांच्या सुविधेसाठी राज्य निवडणूक आयोगाने 'मताधिकार' नावाचे विशेष मोबाईल अ‍ॅप लाँच  केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या मतदार यादीतील आपले नाव, मतदान केंद्र आणि ओळखपत्राचा तपशील शोधता येणार आहे.

मतदारांना 'गुगल प्ले स्टोअर'वरून हे  अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अ‍ॅपमध्ये नाव किंवा EPIC क्रमांक टाकून मतदार यादीतील आपले नाव व मतदान केंद्र शोधता येणार आहे. 

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 9 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल. ‘मताधिकार’ मोबाईल ॲप  मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदाराला त्याचे नाव या मतदान केंद्राच्या यादीत नसल्याने वेगवेगळ्या मतदान केंद्रावर नाव शोधण्यासाठी जावे लागते, यात बराच वेळ वाया जाण्याबरोबरच मनस्ताप देखील सहन करावा लागतो,  हे सर्व टाळण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप फायदेशीर ठरणार आहे. 

‘मताधिकार’ मोबाईल अ‍ॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड केल्यानंतर  या अ‍ॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. मतदार यादीतील नावासोबतच मतदान केंद्रही कळू शकते. याशिवाय निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून मोबाईल अ‍ॅपप्रमाणेच ‘नाव’ किंवा EPIC क्रमांक नमूद करून नाव शोधता येईल.