जेएनएन, मुंबई. Educational News: राज्यातील सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर असलेल्या अधिव्याख्यात्यांचे (शिक्षक) मानधन वेळेत देता येईल असे नियोजन तंत्र शिक्षण संचालनालय यांनी करावे ,असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

मंत्रालयात झाली बैठक

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय तंत्रनिकेतनांमधील तासिक तत्वावरील अभ्यागत अधिव्याख्यात्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

दरमहा मानधन मिळेल असं नियोजन करा

शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये कायमस्वरूपी अध्यापकांच्या बरोबरीने अनेक अभ्यागत अधिव्याख्याते तासिका तत्वावर कार्यरत आहेत. या अधिव्याख्यात्यांना सैद्धांतिक (थिअरी) तासासाठी रुपये 800 आणि प्रात्यक्षिक तासासाठी रुपये 400 याप्रमाणे मानधन  दिले जाते. याबाबत महाविद्यालयांनी तासिका तत्वावर असणाऱ्या अधिव्याख्यात्यांना दरमहा मानधन मिळेल असे  नियोजन करावे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

    तासिका तत्वावर अध्यापकांच्या नियुक्तीबाबत बाजू मांडणार

    न्यायालयाने तासिका तत्वावर अध्यापकांच्या नियुक्ती करण्यास स्थगिती दिली आहे. वाढती विद्यार्थी संख्याआणि नवीन अभ्यासक्रम याचा विचार करून  राज्यातील सरकारी  तंत्रनिकेतन, अधिव्याखात्यांची  कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणीक अभ्यासक्रमावर आणि गुंणवतेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे येत आहेत. यासंदर्भात न्यायालयात राज्य शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

    या बैठकीला माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक व अधिकारी उपस्थित होते.