जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारातून एका डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. संजय तेली असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. तब्बल पाच दिवसांनंतर सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह बहुला धरणात पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे 1.25 कोटी रुपयांच्या शेतजमिनीच्या व्यवहारावरून ही हत्या झाल्याचा संशय आहे. राहुल धर्मराज पाटील या जमीन दलालाने 1.90 लाख रुपये कमिशन देण्याच्या बहाण्याने डॉ. तेली यांना गोराडखेडा येथे बोलावले होते.

कमिशनच्या पैशांवरून वाद, धारदार शस्त्राने हल्ला
जमिनीच्या व्यवहारासंदर्भात डॉ. संजय तेली आणि राहुल पाटील यांच्यात चर्चा सुरू असताना कमिशनच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर राहुल पाटील याने धारदार शस्त्राने डॉ. तेली यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकला
हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीप गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पाटील याने आपला कर्मचारी संजय भिल याच्या मदतीने डॉ. तेली यांचा मृतदेह पोत्यात भरला आणि बहुला धरणात फेकून दिला.

मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्समुळे आरोपी जाळ्यात
डॉ. तेली बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन, कॉल डिटेल्स आणि परिसरात आढळलेल्या वाहनाशी संबंधित पुरावे तपासण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी राहुल धर्मराज पाटील आणि संजय भिल यांना अटक केली.

कुटुंबीयांचा 80 लाख रुपये दिल्याचा दावा
दरम्यान, मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. जमिनीच्या व्यवहारापोटी आरोपींना यापूर्वीच ८० लाख रुपये देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.

    दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण, आर्थिक व्यवहार आणि इतर संभाव्य सहभागाचा तपास पोलीस करत आहेत.

    हेही वाचा: Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी बस उलटल्याने भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, 27 जखमी