जेएनएन, मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम इंदू मिल येथे जलद गतीने सुरू असून सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढील वर्षी 6 डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनी हे भव्य स्मारक लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात अनुयायी मुंबईत दाखल झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. मुख्यंमंत्रीनी सांगितले की,स्मारकाच्या कामाला वेग देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

समन्वय समितीची पुनर्स्थापना

पुतळा संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण मागण्यांनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नव्याने एक समन्वय समिती स्थापन केली. या समितीमार्फत प्रकल्पातील अडथळे दूर करण्यात येत आहेत.येत्या पावसाळ्यापूर्वी पुतळ्याचा ढाचा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अडचणी न आल्यास पुढील महापरिनिर्वाण दिनी स्मारक लोकार्पण करण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्मारक समितीने दिली.

350 फूट उंच भव्य पुतळा

इंदू मिल प्रकल्पात उभारला जाणारा डॉ. आंबेडकरांचा पुतळा हा 100 फूट उंच पायथा आणि 350 फूट उंच कांस्य पुतळा असा एकूण 450 फूट उंचीचा जागतिक स्तरावरील भव्य स्मारक असणार आहे. हेच बांधकाम प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पुतळ्याच्या कामात आवश्यक असणारे 6,000 टन पोलाद लागणार असून सध्या:1,400 टन पोलाद साइटवर उपलब्ध आहे. 650 टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. तसेच पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले असून दोन्ही बुटांचे कांस्य पॅनेल तयार आहेत. त्यातील शिलाई, लेस आणि तपशील अत्यंत हुबेहूब व सूक्ष्म दर्शवणारे आहेत.

    स्मारकाच्या मुख्य इमारतीचे 100% स्ट्रक्चरल काम पूर्ण

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक परिसरात अनेक इमारतींचा समावेश आहे. स्ट्रक्चरल भागात महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत.सध्या अंतर्गत सजावट, विद्युत–यांत्रिक कामे आणि बाह्य विकास गतीने सुरू आहेत.

    प्रमुख सुविधा

    • प्रवेशद्वार इमारत
    • संशोधन केंद्र
    • वाचनालय
    • प्रेक्षागृह
    • विशाल वाहनतळ
    • या सर्वांची संरचनात्मक कामे 100% पूर्ण झाल्याचे स्मारक समितीकडून सांगण्यात आले.

    हेही वाचा: Mahaparinirvan Diwas 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महामानव का म्हणतात? हे सांगणाऱ्या 10 गोष्टी 

    एक वर्षात स्मारक पूर्णत्वास?
    सध्या उर्वरित कामात सर्वाधिक भर पुतळ्याच्या उभारणीकडे आहे.कांस्य आवरणासाठीचे कास्टिंग मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे. पायथ्याचे बांधकाम सुरु असून पुढील काही महिन्यांत त्यात वेग अपेक्षित आहे. अडथळे न आल्यास “इंदू मिल स्मारक पुढील महापरिनिर्वाण दिनी राष्ट्राला समर्पित केले जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.