जेएनएन, मुंबई: भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana Day) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील चैत्यभूमीवर उपस्थित राहून अभिवादन केले. या वेळी त्यांनी बाबासाहेबांच्या दूरदृष्टी, समाजउद्धाराच्या कार्याचा आणि संविधाननिर्मितीतील योगदानाचा विशेष उल्लेख केला.

मुख्यमंत्री म्हणाले, “देशात एकेकाळी प्रचंड सामाजिक विषमता होती. अनेकांना मानवी हक्कांपासून वंचित रहावे लागत होते. अशा कठीण काळात बाबासाहेबांनी ज्ञान, परिश्रम आणि संघर्षाच्या बळावर समाजजागृती केली, समतेची बीजं रोवली आणि स्वातंत्र्यानंतर सर्वसमावेशक संविधान दिलं.”

“जे अमेरिकेला जमलं नाही ते बाबासाहेबांनी केलं” – फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले की, आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच तिसऱ्या स्थानी पोहोचेल. “या प्रगतीची पायाभरणी जर कोणी केली असेल, तर ते बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या संविधानामुळेच देशात बंधुता, समानता आणि संधींचे समत्व टिकून आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी एक उल्लेखनीय किस्सा सांगितला: “नुकतेच न्यू जर्सीचे गव्हर्नर भेटले होते. त्यांनी अमेरिकेतील वीज व्यवस्थापनातील काही अडचणींचा उल्लेख केला. त्यावेळी मला आठवले की मंत्रीपद स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी घेतलेला पहिलाच मोठा निर्णय म्हणजे ‘राष्ट्रीय वीज ग्रिड’ची कल्पना. आज देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचते, त्याचे श्रेय बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला जाते.”

आंबेडकर स्मारकाचे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न

फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संविधानाला सर्वोच्च धर्मग्रंथ मानतात. जगातील सर्वोत्तम संविधान म्हणजे भारताचे संविधान. सामान्य माणसापासून ते गुंतागुंतीच्या समस्यांपर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या संविधानात आहे.”

महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा बाबासाहेबांना अभिवादन करत, “आनंदरावजींनी सुचविल्यानुसार पुढील महापरिनिर्वाण दिनाआधी डॉ. आंबेडकर स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा: Mahaparinirvan Din 2025 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेअर करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रभावशाली संदेश