जेएनएन, मुंबई. पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर आता मुंबईतही मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश प्रभावी राहणार आहेत.

 कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 

पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती तसेच मानवी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना परवानगीशिवाय एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. 

सध्या देशभरात विविध मुद्द्यांवर आंदोलने सुरू आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू असून, NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधातही विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलनाची तयारी केली जात आहे. महाराष्ट्रातील काही भागांतही आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.

यापूर्वी पुणे शहरातही अशाच प्रकारचे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबईतही समान स्वरूपाचे आदेश लागू करण्यात आल्याने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. 

मुंबई पोलिसांनी नागरिकांना आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. जमावबंदीच्या काळात परवानगीशिवाय मोर्चे, निदर्शने, सभा किंवा मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास मनाई असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.