जेएनएन, मुंबई: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे नेते व आमदार नाना पटोले विजय यांनी या कृतीवरून शिवसेनेला सुनावले असून, देशात कायदा आहे की नाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वड्डेटीवार यांनीही संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नाना पटोले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “खरंतर या देशात कायदा आहे की नाही? व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही? हा संजय निरुपम काय बोलतो? शायना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहे. तुम्हाला पुस्तकातील मजकूर मान्य नसेल, तर त्याचे खंडन करा. त्यावर टीका करा. मात्र, अशा प्रकारे पुस्तक फाडणे योग्य आहे का?” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
विजय वडेट्टीवार यांनी पुस्तकाच्या लोकप्रियतेचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, या पुस्तकाला देशातच नव्हे, तर जगभरातून मागणी होत आहे. एका परदेशी महिलेने भारताची नागरिक म्हणून आयुष्य व्यतीत केले, देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा महिलेने लिहिलेल्या पुस्तकाबाबत मतभेद असतील, तर वैचारिक पातळीवर त्याला उत्तर दिले पाहिजे. पुस्तक फाडून निषेध नोंदवणे ही कोणती पद्धत आहे? अशा प्रकारची मस्ती उतरवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सोनिया गांधी यांच्या पुस्तकाला मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळे अस्वस्थ झाले आहेत. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित प्रवक्त्यांनी दोन गंभीर चुका केल्या आहेत. एका महिलेने संपूर्ण आयुष्य लोकांसाठी खर्च केले, तिच्या पुस्तकाचा अवमान केला आणि दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडला. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली.
नेमका वाद काय?
सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीच्या कथित उल्लेखांवरून हा वाद निर्माण झाला आहे. सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे माफी मागण्यासाठी पत्रे लिहिली होती, असा उल्लेख पुस्तकात असल्याचा दावा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी केला आहे. पुस्तकातील पान क्रमांक 201 आणि 443 वरील मजकुरावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर 18 नोव्हेंबर रोजी मुंबईत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये संजय निरुपम, शीतल म्हात्रे, शायना एनसी, आनंद दुबे यांच्यासह अन्य प्रवक्ते उपस्थित होते. यावेळी पुस्तकातील काही पाने फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर हटवावा आणि पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणीही करण्यात आली.
हेही वाचा: सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध करताना शिंदे गटाची मोठी चूक; फाडला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो!
