जेएनएन, मुंबई. राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या विधेयकाविरोधात उद्या राज्यभरात आंदोलने करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.
हे पक्ष होणार सहभागी
अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शिवसेना (उबाठा), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आंदोलनाची हाक दिली आहे, उद्या बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर हे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितलं.

2 ऑक्टोबर रोजीही होणार आंदोलन
जनसुरक्षा विधेयक हे हुकूमशाही पद्धतीचे असून सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भिती आहे. नक्षलवादाच्या बिमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत, त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही पण सरकार अदानी सारख्या भांडलदारांसाठी काम करत असून त्यांच्याविरोधात कोणीही आंदोलन करु नये, आवाज उठवू नये यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो. या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची, जेलमध्ये टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोध पक्षांनी वज्रमूठ केली असून 10 सप्टेंबर व त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी राज्यात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.