जेएनएन, मुंबई. Maharashtra Dam Water: महाराष्ट्रातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आल्यानंतर आता राज्य सरकारने पुढील वर्षाच्या पावसाचा विचार करून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. राज्यातील काही भागांमध्ये सध्या पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने पुढील पावसाळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि आगामी पाणी नियोजनाबाबत माहिती दिली. जुलै-ऑगस्ट 2027 पर्यंत राज्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागेल, अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याने पाण्याचे नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिले आहे.  

प्रत्येक जिल्ह्याला वॉटर बजेट तयार करण्याच्या सूचना 

उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील गरज यांचा ताळमेळ घालण्यासाठी जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय पाण्याचे बजेट तयार केले जाणार आहे. कोणत्या भागात किती पाणी उपलब्ध आहे आणि जुलै-ऑगस्ट 2027 पर्यंत त्या भागाला किती पाणी लागणार आहे, याचा आढावा घेऊन नियोजन केले जाणार आहे. 

फडणवीस यांच्या माहितीनुसार, उपलब्ध पाणीसाठ्यातून आधी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवला जाईल. त्यानंतर एखाद्या धरणात किंवा भागात अतिरिक्त पाणी उपलब्ध असल्यास त्याचा वापर रब्बी पिके किंवा उद्योगांसाठी करण्याबाबत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे.  

मोठ्या धरणांमधील पाण्याबाबत महत्त्वाचा निर्णय

    राज्यातील काही मोठ्या धरणांमध्ये तुलनेने पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या धरणांमधील पाण्याचा वापर करताना सर्वप्रथम जुलै-ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची गरज सुरक्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. 

    पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवल्यानंतर उर्वरित पाणी उपलब्ध असल्यास ते रब्बी हंगामातील पिके किंवा उद्योगांसाठी वापरण्याचा पर्याय खुला ठेवला जाणार आहे . मात्र, संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय न घेता जिल्हा आणि तालुकानिहाय उपलब्धतेनुसार निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  

    एल निनोमुळे पुढील वर्षाच्या पावसाची चिंता 

    यंदाच्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पुढील वर्षाच्या मान्सूनबाबतही सरकारने सावध भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी सांगितले की, तज्ज्ञांच्या मते एल निनोचा प्रभाव आगामी काळात आणखी वाढून त्याचा उच्चांक फेब्रुवारीच्या आसपास येऊ शकतो. त्यामुळे सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी तयारी केली जात आहे. एल निनोचा परिणाम झाला म्हणजे पुढील वर्षी महाराष्ट्रात निश्चितच कमी पाऊस पडेल, असा निष्कर्ष सध्या काढता येणार नाही. मान्सूनवर अनेक हवामानविषयक घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे सध्याचा अंदाज हा संभाव्य हवामान जोखमीच्या पार्श्वभूमीवर केलेले नियोजन म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे.

    राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ 

    दरम्यान, राज्य सरकारने पावसाची कमतरता आणि इतर निकषांच्या आधारे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये Trigger-1 अंतर्गत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. यानंतर या भागांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना आणि पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. 

    दुष्काळी यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांमध्येही परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. पीक आणि पाण्याची स्थिती पाहून आवश्यक असल्यास Trigger-3 अंतर्गत संबंधित भागांचा पुढील प्रक्रियेत समावेश केला जाऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.