एजन्सी, मुंबई: मुंबईतील एका लोकल ट्रेनमध्ये दोन व्यक्तींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादादरम्यान फेकलेला चाकू लागल्याने 53 वर्षीय प्रवाशाच्या छातीला दुखापत झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.

ही घटना रविवारी विरार-चर्चगेट जलद लोकल ट्रेनमध्ये घडली, असे त्यांनी सांगितले आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचेही स्पष्ट केले. 

सायण येथील रहिवासी सुरेश शर्मा अशी ओळख पटलेल्या या जखमी प्रवाशाने पोलिसांना सांगितले की, ट्रेन अंधेरी स्थानक सोडत असताना दुसऱ्या एका व्यक्तीशी वाद घालत असलेल्या एका इसमाने चाकू फेकला. मात्र, ज्या व्यक्तीच्या दिशेने चाकू फेकला होता तिला तो न लागता त्याऐवजी आपल्याला लागला, असे शर्मा यांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली आणि ट्रेन वांद्रे स्थानकावर थांबली, जिथे दुसऱ्या डब्यात शर्मा यांच्या छातीतून रक्तस्राव होत असल्याचे आढळून आले.

त्यांना तात्काळ वांद्रे स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात नेण्यात आले, जिथे त्यांना प्रथमोपचार देण्यात आले. या प्रवाशाला नंतर पुढील उपचारासाठी भाभा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

पोलिसांनी नंतर चाकू जप्त केला आणि नाशिक येथील रहिवासी शिवा गायकवाड (25) अशी ओळख पटलेल्या आरोपीला ताब्यात घेतले, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

    पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला नंतर वांद्रे लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) ताब्यात देण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.