जेएनएन, मुंबई. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी लोकलच्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. लोकोमोटिव्हमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मांडवी एक्सप्रेस (Mandovi Express) विक्रोळी स्थानकाजवळ अडकली होती. या घटनेचा परिणाम मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर झाला. त्यामुळे काल रात्री अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या विलंबाने धावत होत्या. या बिघाडाचा परिणाम आजही कायम असून, मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या 10 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.
माहितीनुसार, मांडवी एक्सप्रेसच्या लोकोमोटिव्हमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी विक्रोळी परिसरात अडकली होती. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांसह उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाला. परिणामी, काल रात्री मध्य रेल्वेच्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. तर अनेक लोकल निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या.
आजही लोकलचा खोळंबा; प्रवाशांचे हाल
कालच्या तांत्रिक बिघाडानंतर आजही मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नसल्याचे चित्र आहे. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या साधारण 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत असल्याची माहिती समोर आली आहे.
कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप
लोकल गाड्यांच्या विलंबामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालये, व्यवसाय आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. लोकलमधील गर्दी वाढण्याबरोबरच पुढील गाड्यांमध्येही प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
मध्य रेल्वेच्या वाहतुकीतील या विलंबामुळे प्रवाशांना अतिरिक्त वेळ प्रवासासाठी द्यावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
