जेएनएन, मुंबई: मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्यांना आज आणि उद्या नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार 27 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत इच्छुक नगरसेवकांना आपली नामनिर्देशन पत्रे महानगरपालिका सचिवांकडे सादर करावी लागणार आहेत.
महापौर आणि उपमहापौर पदाची निवड ही मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या पदांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाले आहे.दरम्यान संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी अंतर्गत बैठकांवर बैठका घेतले जात आहेत.
आज अधिकृत उमेदवार जाहीर होणार
माहितीनुसार, आज दिवसभरात विविध पक्षांकडून अधिकृत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी महापालिका मुख्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उद्या अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
नामनिर्देशन अर्ज सादर झाल्यानंतर छाननी प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. महापौरपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, या निवडणुकीतून मुंबई महापालिकेतील सत्तेचं गणित स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, महापालिकेतील विविध गटांकडून संख्याबळाची चाचपणी, संभाव्य आघाड्यांबाबत चर्चा आणि अपक्ष नगरसेवकांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला जात असल्याचंही चित्र आहे.
