मुंबई - जुहू येथील कपोळ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील अजय देवगण कुटुंबाशी संबंधित मालमत्तेवर मुंबई महापालिकेच्या के-वेस्ट विभागाने ‘स्टॉप वर्क नोटीस’ बजावली आहे. या मालमत्तेचा प्रस्तावित वापर सलून आणि स्पासाठी करण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अजय देवगण कुटुंबाच्या मालकीची जुहूतील S-10 प्लॉटवरील सुमारे 7,802 चौरस फुटांची मालमत्ता सलून आणि स्पा व्यवसायासाठी भाड्याने देण्यात आली आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी यासाठी Florian Hurel Salons Pvt. Ltd. सोबत पाच वर्षांचा लीव एंड लाइसेंस करार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. करारानुसार पहिल्या वर्षाचे मासिक भाडे सुमारे 16 लाख रुपये असून, दरवर्षी 5 टक्के वाढीची तरतूद आहे. पाच वर्षांच्या कालावधीत अंदाजे 10.61 कोटी रुपयांचे भाडे मिळण्याची शक्यता आहे. 

मात्र, या मालमत्तेचा निवासी वापरातून व्यावसायिक वापर करण्यावरून कपोळ सोसायटीने आक्षेप घेतला आहे. सोसायटीच्या म्हणण्यानुसार, मालमत्ता भाड्याने देण्याला त्यांचा विरोध नाही; मात्र सलून आणि स्पा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या नागरी आणि अन्य वैधानिक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, हा मुख्य प्रश्न आहे. 

सोसायटीच्या तक्रारीनंतर BMCची कारवाई-

कपोळ सोसायटीने या प्रकरणी मुंबई महापालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर BMC अधिकाऱ्यांनी मालमत्ताधारकांकडे संबंधित परवानग्या आणि कागदपत्रे मागितली. के-वेस्ट वॉर्डने या मालमत्तेच्या व्यावसायिक वापरासाठी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मागवलेली आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्याने महापालिकेने स्टॉप वर्क नोटीस बजावली. 

    महापालिकेच्या कारवाईनंतर अजय देवगण कुटुंबाने आपली बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितल्याची माहिती आहे आहे. त्यामुळे पुढील काळात संबंधित परवानग्या आणि कागदपत्रे BMCसमोर सादर केली जातात का, याकडे लक्ष लागले आहे. 

    देवगण कुटुंबाची बाजू काय?

    या प्रकरणात अजय देवगण यांच्या बाजूने वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे. देवगण ग्रुपच्या चीफ लीगल अँड कम्प्लायन्स ऑफिसर रुची कनोजिया यांनी प्रस्तावित वापरासाठी आवश्यक परवानग्या आणि मंजुरी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणात सोसायटीचा आक्षेप आणि देवगण कुटुंबाकडून करण्यात आलेला परवानग्या मिळाल्याचा दावा, अशी दोन बाजू समोर आहेत. 

    सोसायटीने कोणते प्रश्न उपस्थित केले?

    कपोळ सोसायटीने BMCकडे केवळ व्यावसायिक वापराची परवानगी आहे का, एवढाच प्रश्न उपस्थित केलेला नाही. प्रस्तावित सलून-स्पाच्या अनुषंगाने स्ट्रक्चरल काम, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल व्यवस्था, HVAC, प्रवेशमार्ग, पार्किंग, साइनज आणि फायर सेफ्टी यांसंबंधी आवश्यक मंजुरींचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित मालमत्तेच्या विद्यमान ऑक्यूपेशन प्रमाणपत्र मध्ये प्रस्तावित वापराला परवानगी आहे का, याचीही पडताळणी करण्याची मागणी सोसायटीने केली आहे. 

    सोसायटीचा NOC नेमका कशासाठी?

    या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोसायटीने यापूर्वी दिलेला NOC. 22 जुलै रोजी सोसायटीच्या तत्कालीन अधिकृत अधिकाऱ्याने अजय देवगण कुटुंबाला ही मालमत्ता Florian Hurel Salons Pvt. Ltd.ला भाड्याने देण्यास हरकत नसल्याचे नमूद केले होते. मात्र, हा NOC मालमत्तेच्या निवासी स्वरूपात बदल करून व्यावसायिक वापरास स्पष्ट मंजुरी देतो का, यावरच आता वाद आहे. सोसायटीच्या म्हणण्यानुसार, NOCमध्ये आवश्यक सरकारी आणि वैधानिक परवानग्या घेण्याची जबाबदारी मालकांवर टाकण्यात आली होती. 

    सहकार विभागातही प्रकरण

    हा वाद केवळ मुंबई महापालिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही. कपोळ सोसायटीच्या तक्रारीनंतर सहकार विभागातही कार्यवाही सुरू झाली आहे. उपनिबंधक फैयाज मुलाणी यांनी तक्रारीच्या आधारे प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे. या कार्यवाहीतही देवगण कुटुंबाकडून उत्तरासाठी मुदत मागण्यात आली आहे. 

    रहिवाशांच्या अडचणींचाही मुद्दा

    सलून आणि स्पा सुरू झाल्यानंतर ग्राहकांची ये-जा वाढणे, पार्किंगची समस्या, सुरक्षा आणि अरुंद अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण तसेच आवाजाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता सोसायटीतील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली आहे. कपोळ सोसायटीमध्ये सुमारे 32 बंगला प्लॉट असल्याची माहिती असून, अनेक प्रसिद्ध व्यक्ती येथे वास्तव्यास आहेत.