जेएनएन, मुंबई. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाकडे लागले आहे. मुंबईचा पुढील महापौर कधी ठरणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.पुढील आठवड्यात महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुढील आठवड्यात महापौर पदाची आरक्षण सोडत
नगर विकास विभागाकडून पुढील आठवड्यात महापौर पदाची आरक्षण सोडत काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही सोडत निघाल्यानंतरच महापौर पदासाठी कोणत्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड होणार हे स्पष्ट होणार असून, त्यानंतर भाजपकडून महापौर पदासाठीचा चेहरा अधिकृतपणे जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, आरक्षण सोडतीनंतर लगेचच महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईला नवा महापौर मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या हालचालींनाही वेग येणार आहे.पालिकेवर सत्ता मिळाल्यानंतर भाजप आणि महायुतीकडून महापौरपदासाठी कोणता चेहरा पुढे येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरक्षण कोणत्या वर्गासाठी निघते, यावरच संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित होतील. त्यामुळे पुढील आठवड्यातील सोडत ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीचा महापौर कोण होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुढील आठवड्यातील सोडतीनंतर चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर मुंबईच्या राजकारणात आणखी हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
