जेएनएन, अहिल्यानगर: अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या रस्त्याच्या कामाचा संबंध थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविषयक धोरणाशी जोडला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जोर धरला आहे.
‘ट्रम्प यांच्या निर्णयामुळे क्रूड ऑईलचा पुरवठा कमी झाला’
सुजय विखे-पाटील यांनी म्हटले की, ट्रम्प यांच्याकडून सातत्याने बदलती वक्तव्ये केली जात आहेत. इराणवरील हल्ल्यामुळे क्रूड ऑईलचा पुरवठा कमी झाला आणि त्याचा परिणाम तेल रिफायनरीच्या क्षमतेवर झाला, असल्याचा दावा केला आहे.क्रूड ऑईलपासून पेट्रोल आणि डिझेल तयार केल्यानंतर त्यातून डांबर बायप्रोडक्ट मिळते. मात्र क्रूड ऑईलचा पुरवठा कमी झाल्यामुळे रिफायनरी ५० टक्के क्षमतेवर काम करू लागल्या आणि परिणामी डांबराचे उत्पादनही घटले.
‘डांबर उपलब्ध नसल्याने रस्ता रखडला’
सुजय विखे-पाटील यांनी याच मुद्द्याचा संबंध अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाशी जोडला आहे.क्रूड ऑईल कमी झाले आणि डांबर बनवण्याची क्षमता कमी झाली. त्यामुळे डांबर उपलब्ध नसल्याने अहिल्यानगर–मनमाड रस्त्याचे काम रखडले असल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण घटनाक्रमामागे एक ‘मोठी लिंक’ असल्याचे सांगितले. “या रखडलेल्या कामासाठी ट्रम्पच जबाबदार आहेत,” असा थेट दावा त्यांनी केला आहे.
रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत
अहिल्यानगर–मनमाड महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या मार्गावरील अपूर्ण काम, खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. ऑगस्ट २०२५ मध्येही या रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.यापूर्वी रस्त्याच्या कामासाठी विविध तांत्रिक आणि कंत्राटी अडचणी समोर आल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले होते. पहिल्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आले, तर दुसऱ्या कंत्राटदाराचा करार तांत्रिक कारणांमुळे रद्द झाला आणि त्यानंतर तिसऱ्यांदा निविदा काढून काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नोव्हेंबर २०२५मध्ये म्हटले होते.
