Best Bus Route Number One : बेस्ट प्रशासनाने ऐतिहासिक बस मार्ग क्रमांक 1 पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक हाऊस (कुलाबा) आणि वांद्रे रिक्लॅमेशनला जोडणारा बस मार्ग क्रमांक 1 - आजपासून (15 जुलै 2025) पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. काही आठवड्यांपूर्वी "रूट रॅशनलायझेशन" मोहिमेअंतर्गत हा मार्ग बंद करण्यात आला होता.

बेस्टचे महाव्यवस्थापक एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले की, या मार्गावर आठवडाभर वातानुकूलित बसेस धावतील. पुढे जाऊन ही सेवा 'ए-1' म्हणून नियुक्त केली जाईल. मंगळवारी सकाळी कुलाबा डेपोवरून हा मार्ग पुन्हा सुरू होईल.

मुंबईतील सर्वात जुन्या मार्गांपैकी एक असलेला बस क्रमांक 1 मार्ग हा कुलाबा आणि माहीमला जोडणारा होता. मात्र हा अलीकडेच बंद करण्यात आला होता. 1937 मध्ये मुंबईची पहिली डबल-डेकर बस, डेमलर क्लास वाहन, याच मार्गावरून धावली होती. त्यामुळे या मार्गाचे ऐतिहासिक महत्त्व आहे.

बेस्ट प्रशासनाने मार्ग क्रमांक 1 अचानक बंद केल्याने दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता.  विशेषतः दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बेस्टच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. बेस्ट प्रशासनाने म्हटले होते की, या परिसरात मार्ग क्रमांक 51 सेवा देत आहे. मार्ग बेस्ट मार्ग क्रमांक 1 कुलाबा ते वांद्रे तर मार्ग 51 कुलाबा ते सांताक्रूझ दरम्यान धावतो. मात्र याने प्रवाशांचे समाधान झाले नव्हते.

बेस्ट रुट नंबर 1 चे ऐतिहासिक महत्व -

इतिहासात मार्ग क्रमांक 1 हा मुंबईतील एक अत्यंत जुना व प्रतिष्ठित बसमार्ग मानला जातो. हा मार्ग ब्रिटिश काळात सुरू झाला होता. ट्राम युगात ऐतिहासिकदृष्ट्या 'अ' क्रमांक असलेला हा मार्ग नंतर  '1' पर्यंत श्रेणीसुधारित करण्यात आला आणि अखेर कुलाबा येथील आरसी चर्च ते वांद्रे रिक्लॅमेशनपर्यंत वाढविण्यात आला. अलिकडच्या आठवणीत, मार्ग क्रमांक 1 वर टाटा इलेक्ट्रिक बसचेही उद्घाटन करण्यात आले.

    बस सेवेला आजच 99 वर्षे पूर्ण -

    विशेष म्हणजे, आजच (15 जुलै) हा दिवस मुंबईत बस सेवा सुरू होऊन 99 वर्षे पूर्ण होतात कारण 15 जुलै 1926 रोजी भारतातील मुंबई (तेव्हाचे बॉम्बे) येथे पहिली बस सेवा सुरू झाली होती, जी अफगाण चर्च आणि क्रॉफर्ड मार्केट दरम्यान धावत होती.