जेएनएन, मुंबई. दादर कबुतरखाना बंद करण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला आता राजकीय रंग चढला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत, माणसाचे आरोग्य महत्त्वाचे की कबुतरे महत्त्वाची, याचा विचार करायला हवा, असा सवाल उपस्थित केला आहे.
नांदगावकर यांनी कबुतरखाना बंदीच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना म्हणाले की, “माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल तर निर्णय माणसांच्या हिताचा असावा. कोर्टाने जे आदेश दिले आहेत, आम्ही त्याच्याच बाजूने आहोत.”
नांदगावकर यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही जैन मुनिंनी शस्त्र उचलण्याची भाषा केलेली नाही. निलेश जैन मुनि हे एक सन्माननीय मुनि असून, त्यांनी जे विधान केलं ते फक्त त्यांचे वैयक्तिक मत होते. तसेच सुप्रीम कोर्टातही त्यांची याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र ती ग्राह्य धरण्यात आली नाही.
वादाची पार्श्वभूमी!
दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्यासह मुंबईतील इतर कबुतरखान्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार होती. श्वसनाचे आजार, ॲलर्जी आणि इतर संसर्गजन्य रोग वाढल्याची अनेक उदाहरणे निदर्शनास आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सादर मधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत दादरचा कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला.
मनसेची भूमिका
नांदगावकर यांनी सूचित केले की, पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. माणसांचे आरोग्य प्रथम. त्यांनी सुचवले की, जिथे कबुतरखाना आहे तिथे राहणाऱ्यांच्या आरोग्याचा विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, पण जर तो घातक ठरत असेल, तर तो बंद करणे गरजेचे आहे.