जेएनएन, मुंबई. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा जाणवत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अकवान चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील तापमानावर होत असून, राज्याच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. हवामानातील या बदलामुळे सध्या थंडीचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या काही दिवसांत उत्तर भारतातून दक्षिण भारताच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली होती. त्यामुळे मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि राज्यातील अन्य भागांत पहाटेच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे वातावरणातील हवेच्या प्रवाहांमध्ये बदल झाला आहे. उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग मंदावल्याने महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता सध्या कमी झाली आहे.

चक्रीवादळामुळे थंडीचा जोर कमी होणार 

अकवान चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील तापमानावर होत असल्याने मुंबईसह महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता कमी आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या वेळी जमिनीतील उष्णता बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस दुपारच्या वेळ उन्हाची तीव्रता तुलनेने कमी जाणवू शकते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात जाणवणारा थंडीचा कडाका काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. 

नोव्हेंबरअखेर पुन्हा थंडी वाढणार? 

चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणारे थंड वारे पुन्हा वेग पकडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागांत निर्माण झालेली थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील किमान तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज आहे.