जेएनएन, मुंबई. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या अपघातासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या भूमिकेवरून आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांबाबत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी लाड यांनी केली आहे.
प्रसाद लाड यांनी आपल्या पत्रातून शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले आरोप पक्षाला मान्य आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे आरोप मान्य नसतील, तर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी त्यांचे जाहीरपणे खंडन करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आरोप मान्य नसतील तर जाहीर खंडन करा
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे उपस्थित केले होते.या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी शरद पवारांना पत्र लिहून रोहित पवार यांच्या विधानांबाबत पक्षाची भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
रोहित पवार यांचे आरोप पक्षाच्या अधिकृत भूमिकेचा भाग नसतील, तर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ते स्पष्टपणे फेटाळून लावावेत. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोप मान्य नसतील, तर त्यांचे खंडन करण्याची भूमिका शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी घ्यावी, असे लाड यांनी पत्रात म्हटले आहे.
खंडन करणार नसाल तर पक्षाचा पाठिंबा जाहीर करा
दरम्यान, रोहित पवार यांच्या आरोपांचे पक्ष नेतृत्वाकडून खंडन केले जाणार नसेल, तर या आरोपांना पक्षाचा पाठिंबा आहे, असे जाहीर करावे, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आणि त्यासंदर्भातील प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच भाजप आमदाराने थेट शरद पवारांना पत्र लिहिल्याने या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडून या पत्राला अथवा रोहित पवार यांच्या आरोपांबाबत अद्याप काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Bank FD Rate Hike: ‘या’ सरकारी बँकेने एफडीवर वाढवला व्याजदर, 5 लाखांच्या गुंतवणुकीवर किती मिळेल मॅच्युरिटी?
